IHRA News

IHRA Live News

आपलं घर – एका बापमाणसाची वैभवशाली जीवनसाधना

दिपाली चौहन/प्रतिनिधी/(जिल्हा वर्धा)११/०२/२०२२

सुप्रसिद्ध समाजसेवक लोकमित्र श्री काशिनाथसोनटक्के
(संचालक-ग्राम इंडिया) यांनीआपल्या ह्या शब्दातून अतिशय सुंदर लेख व अनुभव आमच्यासोबत साझा केला , त्यांच्या त्या ओळीतुन जणूकाही शिकण्यासारखे आहे, “बापमाणसाची गोष्ट अचंबित करणारी आहे. विजुभाऊ म्हणाले जखमा होतात वेदनाही होतात.पण काळ उपचार करून आपल्याला जगण्याची उर्जा देत राहतो.”

नागपूर आकाशवाणीतून निवृत्त झालेले माझे सदाबहार युवा सन्मित्र संजय भक्ते यांचा एके दिवशी फोन आला संजूभाऊ मला म्हणाले तुम्ही पुण्यात आहात तर माझे मित्र आपलं घर च्या विजय फळणीकरांना जाऊन नक्की भेटा. नागपूरला संजूभाऊ कडे गेल्यावर विजयभाऊंबद्दल चर्चा झाली. मग मी पुण्यातआल्यावर फोनवर बोलून आपलं घर ला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली विजुभाऊ म्हणाले येता का आता मी आहेच आपलं घर येथे..अस करा तुम्ही जेवायलाच या. असा आपुलकीने संदेश मिळताच मी सिंहगडाच्या दिशेने निघालो.

सिंहगड पायथ्याशी डोणजे या गावात “आपलं घर” आहे. आपलं घर येथे नवीन प्रशस्त हाॅस्पिटलच्या उभारणीचे कामं सुरू आहे. तरीही वेळात वेळ काढून विजुभाऊंनी स्वागत केले आणि आमचा संवाद सुरु झाला. दरम्यान जेवणं झाले. विजुभाऊंचे कार्य आणि आपलं घर जाणून जाणून घेणे सुरू होते. या छोट्याशा भेटीत ते शक्य नव्हते. विजुभाऊंनी पराजय नव्हे विजय हे त्यांचा जीवनप्रवास उलगडणारे पुस्तक मला दिले. मी घरी आल्यावर दोन दिवसात वाचून झाल्यावर मला लक्षात आले की आपण वैभवशाली जीवनसाधनेत रमलेल्या एका बापमाणसासोबत जोडलो गेलो आहे. विजय फळणीकर या जिगरबाज बापमाणसाची गोष्ट अचंबित करणारी आहे. विजुभाऊ म्हणाले जखमा होतात वेदनाही होतात.पण काळ उपचार करून आपल्याला जगण्याची उर्जा देत राहतो.

बहुधा संकट आली पराभूत मानसिकता तयार होते रडगाणे सुरू होते. विजुभाऊंचा जीवन प्रवास पाहिला संकट म्हणजे काय असते आणि कशी मात करीत माणूस कसा पुढे जातो याचे उत्तम उदाहरण आहे. नागपूरला बालपणी घरी असलेली सुबत्ता आणि वडिलांच्या निधनानंतर अचानक परीस्थितीवश आलेली अठराविसे गरीबी आणि समाजाचे दाहक अनुभव. यातून बाहेर पडून मुंबईत यशस्वी होण्यासाठीची बालपणीची कहाणी अंगावर काटा आणते. मुंबईतील फुटपाथवर जगणं आणि डोंगरीच्या बालसुधारगृहातील आयुष्याला आकार देणारा आगळावेगळा अनुभव ठरला. परत नागपूरला आल्यावर राजगिरा लाडू, हारफुल अगरबत्ती ते झेरॉक्स व्यवसाय तसेच नागपूर दूरदर्शनवर स्वरचीत महाराष्ट्र गीत प्रसारित झाले. दूरदर्शनसाठी नाट्यछटा, बालगीते आणि महाराष्ट्र देशाचे नागपूर दूरदर्शनवरील भव्य सादरीकरण ते पुण्यातील बालचित्रवाणीतील नोकरी, नेमप्लेट विक्री, प्रतिमा कम्यनिकेशन्सचा यशस्वी व्यवसाय यातून जीवन समृद्ध होत झालेले असतांना आयुष्यात सर्व काही सुरळीतपणे असतांना Acute Leukemia ने पुत्रवियोगाची अतिशय दुःखद वेदनादायी घटना आणि कोसळून पडणे यातून विजुभाऊ आणि साधना वहिनींचा जगाचा निरोप घेण्याचा टोकाचा निर्णय झाला होता पण…

मात्र या भयंकर दुःखद घटनेनंतर परत जीवनाने जगण्याची आगळीवेगळी दिलेली संधी घेत मुलगा वैभवच्या स्मृती प्रित्यर्थ सुरू केलेल्या संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेली Ambulance सेवा आणि त्यातील थरारक अनुभव घेत पुढे स्वता:च्या दु:खावर मात करीत अथकपणे अनेकांना आधार ठरलेली आपलं घराची वैभवशाली जीवनसाधना म्हणजे माणूस काय करू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण आहे विजयभाऊ फळणीकर

लेखन,कलादिग्दर्शक,नाटक निर्माण,उत्तम हार्मोनियम वादक, अठराविसे गरीबी आणि श्रीमंती तसेच जीवनाचे दाहक अनुभव घेत आयुष्यात अनेकांना जोडत विजुभाऊ फळणीकर आणि आपलं घर म्हणजे समाजसेवेचा आदर्श आहे. डोंगरी च्या बालसुधारगृहात भेटलेले आणि आयुष्याला दिशा देणारे श्री यशवंत काळे, अभिनेते दिलीप प्रभावळकर, सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर तसेच सामान्य माणसं ते समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर लोक आपलं घर सोबत जुळले आहेत. निराधार मुलांना आधार, वृध्दाश्रम, उद्योग प्रशिक्षण आणि आपलं घर परिसरातील गांवात आरोग्य सेवा असे सेवाभावी कार्य विशेषतः शासनाचे कुठल्याही प्रकारची मदत न घेता खर्या अर्थाने लोकसहभागातून सुरू आहे. आवश्यक तेवढाच निधी वापरणे उरला तर परत करणे हा प्रामाणिकपणा देखील येथे आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हस्ते मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासह अनेक पुरस्कार विजुभाऊंच्या कार्याला मिळाले आहेत.

सुरेश भटांच्या भाषेत विजुभाऊंची वैभवशाली जीवनसाधना म्हणजे
” दुभंगून जाता जाता मी अभंग झालो l
चिरा चिरा जुळला माझा आत दंग झालो “

निराधार मुल आणि वृद्ध हे सामाजिक असंवेदनशीलतेची देणआहे. प्रत्येकालाच कौटुंबिक व्यवस्थेत आपुलकी, जिव्हाळा आधार मिळतोच असं नाही. मजबूरी आणि कौटुंबिक/ सामाजिक असंवेदनशीलतेमुळे अनेकांच्या वाट्याला अनाथपणा येतो. अशांना “आपलं घर ” येथे आधार मिळाला आहे. जीवनाची दिशा मिळाली आहे. अक्षरशः मुळापासून उन्मळून पडणारे असंख्य प्रसंग येऊनही विजुभाऊ फळणीकर समर्थपणे आज कार्यरत आहेत. ही पहिली भेट मला जीवनाचा आणखी एक अर्थ शिकवून गेली.

लोकमित्र संजय काशिनाथ सोनटक्के
संचालक-ग्राम इंडिया
(लोकसहजीवन-जीवनाधार संवर्धन केंद्र)
9822459495
sanjaylokmitra@gmail.com

0Shares
error: Content is protected !!