जावळी प्रतिनिधि/कदिर मणेर
जावळी : गेले चार दिवस पश्चिम भागात संततधार पाऊस सुरू आहे. मात्र,जावळी तालुक्याच्या पूर्व भागात तो कमी होता. आज सकाळपासून संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून नदी, नाले व ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत.
दमदार पावसाच्या सरी कोसळत असल्याने गेली महिनाभर पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळिराजा सुखावला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात गेली चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. मात्र,कुडाळ सायगाव, करहर आणि मेढा भागात पावसाचा जोर कमी होतो. दमदार पाऊस पडला ॎनसल्याने शेतातून पाणी बाहेर निघाले नव्हते. ओढे व नाले वाहू लागले नव्हते. फक्त जिरवणीचा पाऊस पडत होता.
आज सकाळी नऊ वाजल्यापासून पूर्व भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. दिवसभर मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. पाऊस एकसारखा पडत असल्याने जनजीवन विस्कळित झाले. शेतकऱ्यांनी जनावरे ही आज लवकर घरी आणली.
सव्वामहिना पावसाने दडी मारल्याने ओढे-नाले आटले होते. मात्र, आज दिवसभर पडलेल्या पावसामुळे ते खळखळून वाहू लागले आहेत. शेतात नैसर्गिक उफळे वाहू लागले असल्याने रखडलेल्या भात व नाचणी पुनर्लागणीस आता वेग येणार आहे. वेण्णा नदीसह तालुक्यातील इतर उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्याने बळिराजा सुखावला आहे.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ