IHRA News

IHRA Live News

माझा ‘काटा’काढला तरी चालेल पण जावली बॅंक वाचवा:

कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी

माझा ‘काटा’ काढला तरी चालेल पण, जावली बॅंक वाचवा : मानकुमरे यांचे भावनिक आवाहन जावली सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माझा ‘काटा’ काढला तरी चालेल पण, जावली बॅंक आ. शशिकांत शिंदे यांच्या ताब्यात जावू देवू नका, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी नववर्षारंभीच करून आ. शिंदे यांना ललकारले.
आंबेघर तर्फ, ता. जावली येथील शेतकरी मेळाव्यात मानकुमरे बोलत होते.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव केलेल्या ज्ञानदेव रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात मानकुमरे बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जावली बॅंकेचे चेअरमन राजाराम ओंबळे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. अर्चना रांजणे व मान्यवर उपस्थित होते.

शशिकांत शिंदे साहेब जावलीत दहा वर्षे आमदार होते म्हणूनच ते कोरेगावचे आमदार होऊ शकले. जावलीचे आमदार असताना त्यांना एकही ‘दमदार’ काम करता आले नाही. तसे असेल तर दाखवा. गेली २० वर्ष त्यांनी गावागावात भांडणे लावली. जिल्हा बॅंक निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी त्यांना भुईसपाट केले. आ.आगामी प्रत्येक निवडणुकीत आपण आपली एकजूट कायम ठेवून आपली ताकद दाखवून देऊ, असेही मानकुमरे म्हणाले.

जावली तालुक्यातील जनतेची अर्थवाहिनी असलेल्या जावली सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे कोणत्याही थराला जातील. माझा ‘काटा’ काढला तरी चालेल पण, ही बॅंक आ. शशिकांत शिंदे यांच्या ताब्यात जावू देवू नका, असे आवाहन मानकुमरे यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केल्याने जावली बॅंकेची निवडणूक सहजसोपी होणार नसल्याचे संकेत दिले.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर जावली तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रमात राजकीय कलगीतुरा रंगला जात आहे. आ. शशिकांत शिंदे हेही आ. शिवेंद्रसिंहराजे व वसंतराव मानकुमरे यांच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने टीका करत आहेत. त्यामुळे यापुढे जावली तालुक्यातील सर्वच निवडणुका अतितटीनेच होणार हे निश्चित मानले जात आहे.

0Shares
error: Content is protected !!