🌿 *ठाणे, श्री सचिन शिंदे*
🌸 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌿 *विभूती योग*
🌸 *अध्याय दहावा*
🌿 *ओवी ८१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌷तेंचि मातें कैसें जाणिजे ।ऐसें कल्पी जरी चित्त तुझें ।तरी मी ऐसा हें माझें ।भाव ऐकें ॥८१॥*
तेच माझे जगात व्यापून असणे कसे जाणावे असे जर तुझ्या चित्तात वाटत असेल, तर जगात मी असा आहे व हे माझे विकार आहेत, ते सांगतो ऐक.
*🌷जे वेगळालां भूतीं ।सारिखे होऊनि प्रकृती ।विखुरले आहेती त्रिजगतीं ।आघविये ॥८२॥*
हे विकार, निरनिराळ्या प्राण्यामध्ये, त्यांच्या प्रकृतीसारखे होऊन संपूर्ण ब्रह्मांडांत पसरलेले आहेत.
➖➖➖🌱💠🌱➖➖
*🌻बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः ।सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४॥*
अर्थ 👉 _बुद्धी, ज्ञान, असंमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दु:ख, होणे, नसणे, भय, अभय_
(माझ्या विभूती)
➖➖➖➖➖➖➖➖
*🌻अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५॥*
अर्थ 👉 _अहिंसा, ममता, तुष्टी, तप दान, यश अपकीर्ती इत्यादी भूतांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात_
➖➖➖🌱💠🌱➖➖
*🌷ते प्रथम जाण बुद्धी ।मग ज्ञान जें निरवधी ।असंमोह सहनसिद्धी ।क्षमा सत्य ॥ ८३ ॥*
प्रथम भाव बुद्धी होय, हे लक्षात ठेव. त्यानंतर जे अमर्याद ज्ञान हा दुसरा भाव होय. मोह नसणे, सर्व सहन करणे, क्षमा म्हणजे कोणी अपकार केल्यास त्याला प्रत्यपकार न करण्याची बुद्धी, सत्य म्हणजे जसे ऐकिले किंवा पाहिले असेल तसेच सांगणे.
*🌷मग शम दम दोन्ही ।सुख दुःख वर्तत जनीं ।अर्जुना भावाभाव मानीं ।भावाचिमाजीं ॥ ८४ ॥*
दम म्हणजे इंद्रियनिग्रह किंवा इंद्रियांचे शास्त्रानुसार नियमन, शम म्हणजे मनोनिग्रह किंवा मनातील विषयवासना क्षीण होणे हे दोन भाव, सुख म्हणजे मनाच्या अनुकुल असणे, दुःख म्हणजे मनाच्या विरूध्द असणे हे जे जगात दिसून येते, त्याचप्रमाणे भावाभाव म्हणजे असणे व नसणे, हे दोन्ही भाव, भावामध्ये भावरूपच आहेत असे समज.
*🌷आतां भय आणि निर्भयता ।अहिंसा आणि समता ।हे मम रुपची पांडुसुता ।ओळख तू ॥ ८५ ॥*
आणखी अर्जुना! भय व निर्भयता, अहिंसा म्हणजे कायावाचा मनाने कोणत्याही प्राण्याला दुःख न देता सुखच देण्याची प्रवृत्ती आणि समता म्हणजे सर्व प्राणिमात्रांना एकसारखे पाहणे, तुष्टी म्हणजे संतोष, तपादिक हे माझे रूप आहे असे जाण.
*🌷दान यश अपकीर्ती ।ते जे भाव सर्वत्र वसती ।ते मजचि पासूनि होती ।भूतांचा ठायीं ॥ ८६ ॥*
बा अर्जुना! दान, यश, अपकीर्ती, हे जे सर्व भाव जगात दिसून येतात, ते सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझ्यापासूनच प्रगट झाले आहेत.
*🌷जैसीं भूतें आहाति सिनानीं ।तैसेचि हेही वेगळाले मानीं ।एक उपजती माझां ज्ञानीं ।एक नेणती मातें ॥ ८७ ॥*
ज्याप्रमाणे निरनिराळे प्राणी आहेत, त्याप्रमाणेच हे निरनिराळे भाव आहेत असे जाण. काही भाव माझ्या स्वरूपाचे ज्ञान करून देणारे आहेत व काही माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करणारे आहेत.
*🌷अगा प्रकाश आणि कडवसें ।हें सूर्याचिस्तव जैसें ।प्रकाश उदयीं दिसे ।तम अस्तुसीं ॥ ८८ ॥*
प्रकाश व अंधार हे दोन्ही सूर्यामुळेच होत असतात. सूर्योदय झाला असता प्रकाश होतो व सूर्यास्त झाला असता अंधार होतो.
*🌷आणि माझें जे जाणणें नेणणें ।तें तंव भूतांचिया दैवाचें करणें ।म्हणौनि भूतीं भावाचें होणें ।विषम पडे ॥८९॥*
आणि मला जाणणे किंवा न जाणणे हे जीवांच्या पूर्वजन्मांतील पापपुण्यरूप कर्माप्रमाणे होत असते, म्हणून भूतांचे ठिकाणी माझे हे कार्यरूपभावाने प्रगट होणे विषम म्हणजे माझ्या ज्ञानाला कोठे अनुकूल व कोठे प्रतिकूल असे झाले आहे.
*🌷यापरी माझां भावीं ।हे जीवसृष्टि आहे आघवी ।गुंतली असे जाणावी ।पंडुकुमरा ॥ ९० ॥*
याप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या कार्यरूप भावाचे ठिकाणी सर्व जीव गुंतून पडले आहेत, असे अर्जुना! जाण.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
🚩 *ओवी ९१ पासून उद्या*
🚩 *|जयजय रामकृष्ण हरि |*
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ