IHRA News

IHRA Live News

*_ठाणे, श्री सचिन शिंदे_*
🔅 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🍁 *विभूती योग*
🔅 *अध्याय दहावा*
🍁 *ओवी ४१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌷जेथ विभूति प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विदग्धा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ॥ ४१ ॥*
     जेथे या अध्यायात भगवान अर्जुनाला आपल्या प्रधान व गौण विभूती आता सांगणार आहेत, ती कथा अत्यंत रसभरित शब्दाने मी तुम्हाला निरूपण करणार आहे.
*🌲देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें । तरि ओंविया होती लेणें । साहित्यासि ॥ ४२ ॥*
    ज्या देशी मराठी भाषेत मी, ती कथा निरूपण करणार आहे. त्या मराठी भाषेच्या सौंदर्यामुळे त्यात प्रतिपादिलेला शांतरस, श्रृंगाररसाला देखील फिका पाडील, तेव्हा माझ्या ओव्या साहित्यालाही अलंकाराप्रमाणे सुशोभित करतील.
*🌷मूळ ग्रंथींचिया संस्कृता । वरि मऱ्हाठी नीट पढतां । अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हें न चोजवे ॥४३॥*
      गीता ग्रंथाच्या मूळच्या संस्कृत भाषेवर माझी केलेली मराठी भाषेतील टीका नीट पडताळून पाहता, मी काढलेला अभिप्राय योग्य आहे असे मान्य झाल्यास, मूळ कोणते हे निवडता येणार नाही.
*🌲जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणिया आंगचि होय लेणें । तेथ अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ॥ ४४ ॥*
     ज्याप्रमाणे अत्यंत सुंदर शरीरावर घातलेल्या अलंकाराला ते शरीरच लेणे होते म्हणजे शोभा आणते, मग कोणी कोणाला शोभा आणली हे सांगता येत नाही.
*🌷तैसी देशी आणि संस्कृत वाणी ।एका भावार्थाच्या सोकासनीं । शोभती आयणी । चोखट आइका ॥ ४५ ॥*
    त्याप्रमाणे मूळ गीता ग्रंथाची संस्कृत भाषा व माझ्या टीकेची मराठी भाषा ह्या दोन्ही एक भावार्थरूप पालखीत बसून कशा चातुर्याने शोभतात, हे लक्ष देऊन ऐका.
*🌲उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वडप । चातुर्य म्हणे पडप । जोडलें आम्हां ॥ ४६ ॥*
    चित्तात स्फुरलेल्या भावार्थाचे स्पष्टीकरण करताना किंवा तो व्यक्त करताना, त्याला रसभरित भाषेचा पाऊस लागेल व त्यामुळे आजच्या जगात या अशा भाषेने आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली असे चातुर्य म्हणेल.
*🌷तैसें देशियेचें लावण्य । हिरोनि आणिलें तारुण्य । मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ॥ ४७ ॥*
     तसे मराठी भाषेचे सर्व सौंदर्य एकत्र करून रसाला तारूण्य आणले व मग त्या योगाने अमर्याद अशा गीता तत्वाची मराठी भाषेत रचना केली.
*🌲जो चराचर परमगुरु । चतुर चित्तचमत्कारु । तो ऐका यादवेश्वरु । बोलता जाहला ॥ ४८ ॥*
     जो चराचर ब्रह्मांडाचा आद्यगुरू, थोर जाणत्याच्याही चित्ताला आश्चर्यचकित करून सोडणारा, असा तो यादवांचा राजा भगवान श्रीकृष्ण पुढे बोलू लागला.
*🌷ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । ऐसें बोलिलें श्रीहरी तेणें । अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणें । धडौता आहासि ॥४९॥*
     श्रीनिवृत्तिनाथांचे ज्ञानदेव म्हणतात, त्या श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले, की अर्जुना! सर्वच गोष्टी ऐकताना तू अंतःकरणाने योग्य असतोस म्हणजे एकाग्र चित्ताने ऐकतोस.
➖➖➖➖🚩➖➖➖
*🌻श्रीभगवानुवाचः भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः । यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १॥*
अर्थ 👉 _श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो, (माझ्या भाषणाने) संतोष पावणार्‍या तुला, तुझ्या हिताच्या इच्छेने जे मी आणखी देखील सांगत आहे ते माझे श्रेष्ठ भाषण ऐक_
(अर्जुनाचे श्रवण)
➖➖➖➖🚩➖➖➖
*🌲आम्हीं मागील जें निरूपण केलें । तें तुझें अवधानचि पाहिलें । तवं टाचें नव्हें भलें । पुरतें आहे ॥ ५० ॥*
     अर्जुना! मी मागे जे निरूपण केले, ते तुझे चित्त एकाग्र आहे किंवा नाही हे पाहण्याकरिताच होते, पण ते अर्धवट नसून पूर्ण एकाग्र होते, हे कळून आले.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
🌲  *ओवी ५१ पासून उद्या*
🌲  *|जयजय रामकृष्ण हरि |*

0Shares
error: Content is protected !!