IHRA News

IHRA Live News

मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ

मुंबई, दि. ९ : “आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू”, अशी पंचप्रण शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांना दिली.

“माझी माती, माझा देश” या अभियानांतर्गत आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ‘माझी माती माझा देश’ अभियानाचे नोडल अधिकारी (ग्रामीण) एकनाथ डवले आणि नोडल अधिकारी (शहरी) गोविंद राज, पोस्ट मास्तर जनरल अभिकांत सिंग तसेच मंत्रालयातील प्रशासकीय व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करत आहोत. लोकाभिमुख निर्णय घेण्याचे तसेच जनतेला न्याय देण्याचे काम हे शासन करत आहे. 2023- 24 च्या अर्थसंकल्पात नमूद विकासाच्या पंचसूत्रीनुसार देशातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपले सरकार करत आहे. ज्या वीरांनी आपल्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या शौर्याला स्मरण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले की, देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. वीर शहिदांची महती त्यांनी वर्णित केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी चालविलेला राज्यकारभार, त्यांचे प्रशासन याबाबतही श्री.मुनगंटीवार यांनी आपले विचार मांडले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासनाकडून दर महिन्याला एक विशेष टपाल तिकीट किंवा विशेष आवरणाचे विमोचन करण्यात येते. याप्रसंगी भारतीय टपाल विभागाने तयार केलेल्या शहाजीराजे भोसले यांच्या विशेष टपाल आवरणाचे विमोचन सर्व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “घरोघरी तिरंगा” या अभियानाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांना कापडी तिरंगा ध्वज देऊन यावेळी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणारी 2 ते 3 मिनिटांची उद्घोषणा वर्षभरासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.45 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. याही उपक्रमाची सुरुवात आजपासून मंत्रालयात करण्यात आली.

यावेळी राज्य शासनाच्या लाभात असलेल्या दोन महामंडळांनी आपापला लाभांश धनादेशाद्वारे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना सुपूर्द केला. यात वन विकास महामंडळाचे 3 कोटी 27 लाख 50 हजार रुपये आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाचे 1 कोटी 34 लाख 15 हजार 733 रुपयांचा समावेश आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाले असून हे प्रमाणपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आले.

सुरुवातीला “माझी माती, माझा देश” या उपक्रमाची रूपरेषा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विषद केली.

0Shares
error: Content is protected !!