जावळी प्रतिनिधि/कदिर मणेर
जावळी (सातारा):अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या देशातील मूलभूत गरजा मानल्या जातात. त्यासुद्धा आपल्याला सोडवता आल्या नाहीत अजून.त्यामुळे अन्नाकरिता सर्वसामान्य माणसाला जी काही कसरत करावी लागते,ती गंभीर स्वरूपाची आहे.या देशात जितकी लोकसंख्या आहे, तितक्याच समस्यासुद्धा आहेत. आज असंख्य समस्यांचा सामना करता करता सर्वसामान्यांना एक-एक दिवस पार पाडावा लागत आहे.इतर समस्यांपैकी एक अतिबिकट समस्या म्हणजे वाढती महागाई.देशात महागाईचा वणवा भडकला आहे.त्याला विझवता नाही येत आणि वाढत्या लोकसंख्येला आवर घालता नाही येत.त्यामुळे महागाईचा पेटलेला वणवा आणि लोकसंख्येच्या विळख्यात सामान्य नागरिकांची मात्र घुसमट होत आहे.असेल त्या भावाने जीवनावश्यक वस्तू खरेदी करून पोटाची खळगी भरणे हे सर्वसामान्यांसाठी आता रोजचेच झाले आहे.श्रीमंतांना मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी काही फरक पडत नाही,पण सर्वसामान्य माणूस आज खचलाय,त्याला रोज चूल पेटवायची म्हटले तरी डोळ्यासमोर महागाईचा अागडोंब उभा राहतो.महागाईला आवर घालायचा असेल, तर त्याची उपाययोजना व्यापक पाया ठेवूनच करावी लागेल,पण याची खंत सरकारला नाही.
जनतेला केवळ महागाईच्याच झळा सोसाव्या लागतात असे नाही,तर कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे अनेकांची रोजीरोटी कायमची हिरावून नेली.असंख्य लोक बेरोजगार झाले.त्यामुळे नोकरीशिवाय कुटुंबाचा गाडा हाकणे अनेकांसाठी कठीण होऊन बसले.मुलांच्या शिक्षणातही अडचणी निर्माण झाल्या.शिक्षणाबरोबर आरोग्याचा प्रश्नदेखील ‘आ’ वासून उभा आहे. औषधांच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या.त्यामुळे वैद्यकीय उपचार प्रचंड महाग झाले आहेत.ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर गेली आहे,तर दुसरीकडे खासगी वैद्यकीय उपचार प्रचंड महाग आहेत.वैद्यकीय उपचार घेणे शक्य होत नसल्यामुळे अनेकांना उपचारांअभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत.वाढत चाललेली महागाई आणि तितक्याच वेगात वाढत चाललेली बेरोजगारी, बालमजुरी, शिक्षण, आरोग्य, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या असे एक ना अनेक प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. दैनंदिन जीवनातील डाळ,खाद्यतेल, भाज्या,दूध,कडधान्य सारे जिन्नस महागले असताना इंधन दरवाढीच्या चटक्याने जनता हैराण झाली आहे.स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर तर हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला आहे.गोरगरीबांसाठी या सिलिंडरवर सरकार अनुदान देत असते.केंद्रात मोदी सरकार आल्यापासून ही सबसिडी ग्राहकांच्या खात्यात थेट जमा होत होती,पण गेल्या काही महिन्यांपासून ही सबसिडी बंद झाली आहे.केंद्र सरकारने याबाबत कसलेही स्पष्टीकरण दिलेले नाही.पूर्वी असे झाले की, ‘लाटणे मोर्चा’, ‘हंडा मोर्चा’ निघे. आता असे काही होत नाही. ‘हेच आपले नशीब” म्हणत जो तो कसंतरी जगतो आहे.जगायचे तर काही सहन केलेच पाहिजे असे म्हणायला खूप सोपे असते,पण चटके म्हणून जनतेने कोणकोणत्या प्रकारचे आणि किती सहन करायचे,याला काही मर्यादा आहेत की नाही?
‘वाढता वाढता वाढे” असे म्हणता म्हणता देशातील मोकाट सुटलेल्या महागाईशी जगण्यासाठी सर्वसामान्यांची केविलवाणी झुंज चाललेली आहे. वाढत्या महागाईने देशातील जनता मेटाकुटीला आली आहे. मात्र दररोज वाढणाऱया महागाईच्या संकटाशी सामना करण्याचे कोणतेही ठोस प्रयत्न सरकारी यंत्रणांकडून होत असल्याचे जाणवत नाही. जगातले अनेक देश महागाई आटोक्यात आणून आपल्या देशातील गरिबी कमी व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. आपले सरकार मात्र गरिबी आणि महागाई समान पातळीवर ठेवून ती हळूहळू वाढत कशी राहील यासाठी कोणत्याही प्रयत्नात कसर सोडत नाही.यामुळे आज पंतप्रधान,केंद्रीय अर्थमंत्री, कृषिमंत्र्यांपासून सर्व संबंधित मंत्र्यांपर्यंत सर्व जणच महागाईची जाणीव असल्याचे सांगून सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असल्याची ग्वाही देत आहे.प्रत्यक्षात मात्र महागाईचा निर्देशांक ऑलिम्पिकमधील धावपटूप्रमाणे झपाटय़ाने पुढे पुढे सरकत आहे. त्यामुळे जनतेच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.असा वनवास ज्यांच्या वाटय़ाला येतो त्यालाच त्याची दाहकता किती आहे ते कळते. इथे ज्येष्ठ कवी कै. मंगेश पाडगावकर यांची ‘सांगा कसं जगायचं ?” ही कविता आठवते. या कवितेतून त्यांनी विचारलेला ‘सांगा कसं जगायचं, हा प्रश्न आज देशातील कोटय़वधी जनताही सरकारला विचारते आहे.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ