जावळी प्रतिनिधि/कदिर मणेर.
जावळी (सातारा):मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सत्तांतर घडवत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ.
एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील जावळी खोर्यातील दरे गावचे सुपुत्र असल्याने त्यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रिपद मिळाले अाहे.यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले,पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आता एकनाथ संभाजी शिंदे हे सातार्याच्या मातीतून महाराष्ट्राला मिळालेले चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत.
महाराष्ट्राचे राजकारण घडवण्यात सातारा जिल्ह्याच्या मातीचा सिंहाचा वाटा राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आल्यानंतर यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. दि. १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ या कालावधीत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. सातारा जिल्ह्यातील कराडच्या मातीतून तयार झालेल्या या नेत्याने महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व दिले. दि.२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ या कालावधीत बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कलेढोण गावचे रहिवासी असलेल्या बाबासाहेबांची इंदिरा गांधींवरची निष्ठा त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद देऊन गेली.आज एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा सुखद धक्का सातारा जिल्ह्याला बसला तसाच १९८२ साली बाबासाहेब भोसले यांना आकस्मिकपणे मुख्यमंत्रीपदावर बसवले गेल्याने सातारा जिल्ह्याला सुखद धक्का बसला होता.दि.१० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४ या कालावधीत पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सातारा जिल्ह्यातील कराड येथील पृथ्वीराज चव्हाण यांचीही काँग्रेस निष्ठा फळाला आली आणि त्यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याला तिसर्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले होते.यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले,पृथ्वीराज चव्हाण हे तिघेही काँग्रेसमधूनच मुख्यमंत्री झाले.मात्र,शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावून एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड अविस्मरणीय असेच राहणार आहे.सातारा जिल्ह्यातील जावळी खोर्यातील दरे तांब या गावच्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास रचला. त्यांच्या रुपाने शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याला मिळाला.तर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा चौथ्यांदा महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.
जावळीच्या दर्याखोर्यातील कोयनेच्या भूमिपुत्राने गेले काही दिवस देशाचे राजकारण हादरवून सोडले.एकनाथ शिंदे यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र चौथ्यांदा राज्याच्या गादीवर बसला आहे.एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
सातारकर मुख्यमंत्री झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करताना सातारा जिल्ह्याने आजवर दिलेल्या मुख्यमंत्र्यांची नामावली आवर्जून उल्लेखली आहे. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर चौथा सातारकर एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्री होत असल्याचा आपणाला आनंद आहे,अशा शब्दांत सातार्याच्या मातीविषयी गौरवोद्गार काढले आहेत.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ