IHRA News

IHRA Live News

ज्ञानेश्वरी यशोगाथा

🍂 *श्री सचिन शिंदे, ठाणे*
🍂 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌸 *विभूती योग*
🍂 *अध्याय दहावा*
🍂 *ओवी २५१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🍀तयां वहिलियां गतिमंतां- । आंत पवनु तो मी पांडुसुता । शस्त्रधरां समस्तां- । माजीं श्रीराम तो मी ॥२५१॥*
     त्यात वायू तो मी आहे आणि शस्त्र धारण करणार्‍यांमध्ये प्रभू रामचंद्र मी आहे.
*🍀जेणें सांकडलिया धर्माचेन कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मीये एक मोहरें । केलें त्रेतीं ॥२५२॥*
     ज्यांनी संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन व आपण आपल्याहून निराळे असे धनुष्य करून त्रेतायुगामध्ये एका विजयरूपी लक्ष्मीला आपल्याच समोर केले — म्हणजे संकटात सापडलेल्या धर्माला एकसारखा विजयच मिळवून दिला असा अर्थ.
*🍀पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं । प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं । गगनीं उदो म्हणतया हस्तबळीं | दिधली भूतां॥२५३॥*
      नंतर सुवेळ पर्वतावर उभे राहून, मूर्तिमंत प्रताप असा जो लंकेचा राजा रावण, त्याची मस्तके आकाशात उदोउदो करणारी भूतपिशाच्चे, यांच्या हातात त्यांना बळी म्हणून ज्याने अर्पण केली.
*🍀जेणें देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धारु केला । सूर्यवंशीं उदेला । सूर्य जो कां ॥२५४॥*
      ज्याने देवांचा मान पुन्हा त्यांना प्राप्त करून दिला व धर्माचा जीर्णोध्दार केला, जो सूर्यवंशामध्ये मूर्तिमंत उगवलेला सूर्यच होय.
*🍀तो हातियेरुपरजितया आंतु । रामचंद्र मी जानकीकांतु । मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजीं ॥२५५॥*
      हत्यार धारण करणार्‍यांमध्ये तो सीतापती रामचंद्र मी आहे. जलामध्ये राहणार्‍या पुच्छवंत प्राण्यांमध्ये मगर मी आहे.
*🍀पैं समस्तांही वोघां- । मध्यें जे भगीरथें आणितां गंगा । जन्हूनें गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ॥२५६॥*
    आणखी संपूर्ण प्रवाहांमध्ये जी गंगा, भगीरथ राजा पृथ्वीतलावर आणीत असता जह्नुराजाने गिळली व मग आपली मांडी  फाडून परत सोडली.
*🍀ते त्रिभूवनैकसरिता । जान्हवी मी पांडुसुता । जळप्रवाहां समस्तां- । माझारीं जाणें ॥२५७॥*
     अशी त्रिभुवनात एकच वाहणारी, अर्जुना! जाह्नवी नदी, ती सर्व जल प्रवाहांमध्ये माझे रूप होय, असे जाण.
*🍀ऐसेनि वेगळालां सृष्टीपैकीं । विभूती नाम सूतां एकेकीं । सगळेन जन्मसहस्रें अवलोकीं । अर्ध्या नव्हती ॥२५८॥*
    याप्रमाणे निरनिराळ्या भूतसृष्टीमधील एका एका विभूतीचे नाव सांगताना हजारो जन्म खर्ची घातले, तरी अर्ध्यादेखील विभूती सांगणे होणार नाही, पहा!
➖➖➖➖➖➖
*🌻सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन । अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२॥*
अर्थ 👉 _हे अर्जुना, सर्व सृष्ट वस्तूंचा आदि, अंत व मध्य मी आहे. विद्यांमधे अध्यात्मविद्या मी आहे आणि वादविवाद करणार्‍यांचा वाद मी आहे._
➖➖➖➖🚩➖➖➖
*🌻अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च । अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३॥*
अर्थ 👉  _अक्षरांमधे अकार मी आहे, समाससमूहामधे द्वंद्व समास मी आहे. क्षयरहित काल मी आहे, सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष  मी आहे_
➖➖➖➖➖➖
*🍀जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं । तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं ॥२५९॥*
     सर्व नक्षत्रे वेचून घ्यावी अशी जर आपल्याला मनात इच्छा झाली तर, ज्याप्रमाणे आकाशाची मोट बांधली पाहिजे.
*🍀कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा । तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावें मातें ॥२६०॥*
    किंवा पृथ्वीच्या संपूर्ण परमाणूंचा झाडा घ्यावा अशी इच्छा झाल्यास, ज्याप्रमाणे सबंध भूगोलच काखेत उचलून घेतला पाहिजे, त्याप्रमाणे माझा संपूर्ण विस्तार पाहावयाचा असल्यास मलाच जाणले पाहिजे.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
🎈  *ओवी  २६१ पासून उद्या*
🎈  *|जयजय रामकृष्ण हरि |*

0Shares
error: Content is protected !!