IHRA News

IHRA Live News

सर्वधर्मसमभाव जपणुकीचा भोंगा वाजविण्याची गरज!

कदिर मणेर/प्रतिनिधी सातारा घशाला कोरड पडली असताना दुसरीकडे राज्यात भोंग्यांवरून राजकीय वातावरण गढूळ होऊ पाहताना दिसत आहे,तहानलेल्यांना पाणी पुरवा असे ओरडून सांगण्याची वेळ आली आहे.
विकासाचे सारे मुद्दे संपले म्हणून की काय,राज्यात सध्या भोंग्याच्या विषयावरून राजकीय गहजब सुरू आहे.प्रार्थना स्थळावरील भोंग्यांवरून हा विषय पुढे आल्याने त्याचा संबंध धर्माशी जोडला जात आहे,पण धार्मिक तणाव अनुभवून झालेली जागोजागची सामान्य जनता अाता यापासून हात झटकून दूर असलेली दिसत आहे.ही खूप मोठी समाधानाची बाब आहे.याचे कारणही साफ आहे,ते म्हणजे भोंग्यांपेक्षा अाज जगण्या मरण्याशी निगडित सामान्य लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत,त्यामुळेच राजकीय पातळीवर चर्चित या विषयावर स्थानिक व सामाजिक पातळीवर प्रतिध्वनी उमटलेले नाहीत. परस्परातील सामाजिक सलोख्याची व बंधुत्व भावाची वीण घट्ट असल्याची खात्री यातून पटून जावी.
आज स्वयंपाकाचा गॅस महाग झाला आहे. इंधनाचे दरही वाढले असून,डाळींचे भाव वाढल्याने गृहिणींच्या किचनचे बजेटही कोलमडले आहे,ई पास मशीन बंद पडल्याने रेशनवरचे धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत,पण आज भलतेच भोंगे वाजविण्यात स्वारस्य दिसत आहे.भलेही ध्वनिप्रदूषण व पर्यावरणाच्या दृष्टीने भोंग्यांचा विषय उपस्थित केला गेला असेल,पण त्यासंबंधीचे भोंगे वाजविण्यापेक्षा जनसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी भोंगे का वाजविले जाऊ नयेत?महत्त्वाचे म्हणजे सध्या उन्हाळा सुरू असून, जागतिक विक्रम नोंदविण्याइतके यंदा तापमान वाढलेले आहे.नेहमी प्रमाणे उन्हाळ्याच्या अगोदर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी टंचाईचे आराखडे तयार करून लाखो रुपयांच्या निधीची तरतूदही करून ठेवली आहे,पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची बोंब होताना दिसत आहे.ग्रामीण भागात तर वाईट स्थिती आहे. मनुष्याच्याच नव्हे तर गुराढोरांच्या व पशुपक्ष्यांच्या चारा पाण्याची व्यवस्थादेखील बिकट बनत चालली आहे. यावरील उपाय योजनाबाबत स्वस्थ असलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनालाही जागे करण्यासाठी खरे तर भोंगे वाजविण्याची गरज आहे.सारांशात, राजकीय धबडग्यात क्षीण होत चाललेल्या माणुसकीचाच जागर गरजेचा आहे.गेल्या कोरोनाच्या संकटात पद,पैसा,प्रतिष्ठा आदी सारे व्यर्थ ठरून माणुसकीच कामात आल्याचे प्रकर्षाने बघावयास मिळाले होते.या संकटातून नवा जन्म लाभलेल्यांनी भलत्या भोंग्यांच्या आवाजात आपल्या कानठळ्या बसू न देता माणुसकी व सर्वधर्मसमभाव जपणुकीचा भोंगा वाजविण्याची भूमिका घ्यायला हवी इतकेच या ठिकाणी म्हणने योग्य वाटत.

0Shares
error: Content is protected !!