उन्हाळ्याची चाहूल ; रसवंती गृहांच्या घुंगरांची खळखळ सुरू ! कदिर मणेर/प्रतिनिधी सातारा यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला असून आगामी काळातील कडक उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी रसवंती चालकांनी कंबर कसली असून रसवंतीगृह यांची घुंगरे आता खुळखुळू लागली आहेत. उन्हाचा तडाका वाढल्याने माठ,टोपी विक्रेते,गॉगल्स,थंडपेये यांना मागणी वाढली आहे.शहरात तसेच महामार्गावर टोपी आणि गॉगल्स विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.माठाला उन्हाळ्यात चांगली मागणी असते.श्रीमंत वर्गालाही या माठाचे आकर्षण असते.माठातील पाणी हानिकारक नसल्याने महाराष्ट्रीयन बनावटीच्या माठांसह गुजरात आणि राजस्थान मधील आकर्षक कलाकुसरीचे माठ बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जातात.स्थानिक कुंभारांनी तयार केलेल्या काळ्यामातीच्या माठाला चांगली मागणी असते.दरम्यान उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने अाता रसवंती गृहाची घुंगरेही खुळखुळू लागली अाहेत.ऊसाच्या ताज्या रसाला ग्राहकांमधून चांगली मागणी अाहे.शहरात अनेक ठिकाणी ऊसाच्या विवीध जातीपासून तयार होणारा ताजा रस पिण्यासाठी रसवंती गृहावर ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.अलीकडच्या काळात पुंड्या ऊस बहुधा फारसा कोठे पाहायला मिळत नसला तरी अद्यापही काही शेतकरी या उसाचे उत्पादन घेत असून त्यांच्याकडून ऊस आणून काही रसवंती चालक पुंड्या उसाचा रस विक्रीसाठी प्रयत्नशील आहेत.त्याचबरोबर अाईस्क्रीमला ही मागणी वाढली आहे.जसजशी उन्हाची तीव्रता वाढत जाईल तसतशी काकडी,पपई, टरबूज,कलिंगडाची आवक हळूहळू वाढत जाणार आहे.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ