IHRA News

IHRA Live News

ज्ञानेश्वरी चिंतन

*ठाणे प्रतिनिधी श्री सचिन शिंदे*
*मो 9820375869*
🔔 *सार्थ ज्ञानेश्वरी*
♦️ *अध्याय ४था*
🔔 *ज्ञानकर्मसंन्यासयोग*
♦️ *ओवी १४७ पासून*
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
*🌻अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति |सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ||४-३०||*
अर्थ 👉   _दुसरे कोणी मिताहारी होउन वायूंच्या ठिकाणी प्राणांचे हवन करतात म्हणजे प्राणायामादी सर्व वायूंना स्वाधीन ठेवतात. हे सर्व यज्ञवेत्ते याज्ञिक या निरनिराळ्या यज्ञांनी ज्यांची पातके नष्ट झाली आहेत असे जाणावेत_
➖➖➖➖🚩➖➖➖➖
🌷 *एक वज्रयोगक्रमें।सर्वाहारसंयमें। प्राणीं प्राणु संभ्रमें।हवन करिती॥१४७॥*
   कोणी हठयोगाच्या क्रमाणे सर्व आहार जिंकून प्राणवायूरूप अग्नीत त्वरेने प्राणांचे हवन करतात.
🌷  *ऐसे मोक्षकाम सकळ। समस्त हे यजनशीळ ।जिहीं यज्ञद्वारा मनोमळ । क्षाळण केले ॥१४८॥*
    अशाप्रकारे मोक्षप्राप्तीचीच इच्छा  करणारे हे सर्व सांगितलेले यज्ञकर्ते असून त्यांनी त्या यज्ञाच्या द्वारे आपले कामक्रोधादिक विकार नाहीसे केलेले असतात.
🌷  *जया अविद्याजात जाळितां। जे उरलें निजस्वभावता। जेथ अग्नि आणि होता। उरेचिना ॥१४९॥*
    अशाप्रकारे सर्व अविद्या, अज्ञान  जाळून टाकल्याने त्याला स्वाभाविकपणे शुध्द स्वरूप उरते व अग्नी आणि यज्ञ करणारा असा द्वैतभाव राहात नाही.
🌷 *जेथ यजितयाचा कामु पुरे। यज्ञींचें विधान सरे। मागुते जेथूनि वोसरे। क्रियाजात ॥१५०॥*
   ज्याठिकाणी यज्ञ करणार्‍याची इच्छा पूर्ण होवून यज्ञक्रिया संपतात आणि अर्थातच शेवटी सर्व कर्मे नाहीशी होतात.
🌷  *विचार जेथ न रिगे। हेतु जेथ न निगे। जें द्वैतदोषसंगें। सिंपेचिना॥१५१॥*
     ज्या ठिकाणी विचारांचा शिरकाव होत नाही, कामनेचा स्पर्श होत नाही व द्वैतदोषांचा स्पर्श होत नाही.
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🍀श्लोक ३१)यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् |नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ||४-३१||*
अर्थ 👉   _त्या सर्व यज्ञांचे अवशिष्ट जे अमृतरूपी फल (ब्रह्म) ते भोगणारे, चिरकालिक ब्रह्मपदाला प्राप्त होतात. या द्वादश यज्ञांपैकी एकदेखील, यज्ञ न करणार्‍याला हा मनुष्यलोक देखील प्राप्त होत नाही. म्हणजे ऐहिक सुखही त्यास प्राप्त होत नाही मग हे कुरुश्रेष्ठा, उत्तम लोक त्याला कसा प्राप्त होणार?_
➖➖➖➖🚩➖➖➖➖
🌷 *ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट। तें सेविती ब्रह्मनिष्ठ। ब्रह्माहंमंत्रे ॥१५२॥*
    असे जे अनादिसिद्ध व शुद्ध यज्ञावशिष्ट ब्रह्म त्या ब्रह्माचे, हे ब्रह्मनिष्ठ लोक अहंब्रह्मास्मि, मी ब्रह्म आहे या मंत्राने सेवन करतात. आणि ब्रह्मरूप होतात.
🌷 *ऐसे शेषामृते धाले । कीं अमर्त्यभावा आले । म्हणोनि ब्रह्म ते जहाले । अनायासे ॥१५३॥*
    ह्याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरूप अमृत पिऊन जे तृप्त होऊन अमर होतात, ते सहज ब्रह्मत्व पावतात.
🌷  *येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि। जें योगयागु न करितीचि। जन्मले सांते॥ १५४॥*
     ज्यांच्या हातून या यज्ञाचे आचरण  घडत नाही, ज्यांना विरक्ती माळ घालीत नाही, ज्यांना आत्मसंयमन करता येत नाही व जन्माला आले असता योगयाग करीत नाहीत.
🌷 *जयां ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुससी काई । म्हणोनि सांगों कां वांई । पंडुकुमरा ॥१५५॥*
      अर्जुना! ज्यांची इहलोकी धडगत नाही, त्यांची परलोकची हालहवाल कशाला पुसतोस? त्यांच्या विषयी गोष्टच बोलणे नको.
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌻श्लोक ३२)एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे |कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे|४-३२|*
अर्थ 👉  _याप्रमाणे पुष्कळ प्रकारच्या यज्ञाचा वेदाच्या मुखात (द्वाराने) विस्तार झालेला आहे. हे सर्व यज्ञ कायिक, वाचिक व मानसिक कर्मापासून होणारे आहेत. आत्म्यापासून होणारे नाहीत, असे जाण. याप्रमाणे ज्ञान झाल्यावर संसारबंधनापासून तू मुक्त होशील_
➖➖➖➖🚩➖➖➖➖
🌷 *ऐसे बहुतीं परीं अनेग।जे सांगितले तुज कां याग। ते विस्तारुनि वेदेंचि चांग। म्हणितले आहाती॥१५६॥*
     अशाप्रकारे जे तुला पुष्कळ प्रकारचे (बारा) यज्ञ सांगितले त्यांच्याबद्दल वेदात पुष्कळ विस्ताराने चांगले वर्णन केले आहे.
🌷 *परि तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें । येतुलेनि कर्मबंधु स्वभावें ।पावेल ना ॥१५७*
     परंतु वेदांतील त्यांचे वर्णन ऐकून आपल्याला काय करायचे आहे,  त्यातील सार हेच की, हे सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत. एवढे आपण जाणले की कर्माची बाधा होणार नाही.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🍀 *ओवी १५८ पासून उद्या*
🍁 *¦¦जयजय रामकृष्ण हरि¦¦*

0Shares
error: Content is protected !!