IHRA News

IHRA Live News

संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

🌹 *ठाणे प्रतिनिधी श्री सचिन* *शिंदे*
🍃 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌹 *अध्याय ३ रा*
🍃 *¦¦कर्म योग¦¦*
🌹 *ओवी १६१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌷काय सांकडे कांही मातें । कीं कवणें एकें आर्तें।आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥१६१॥*
    तुला असे वाटेल अर्जुना, मला काहीतरी संकट पडले असेल किंवा मी कसली तरी इच्छा धरली आहे म्हणून मी स्वधर्माचे आचरण करतो. असे जर तू म्हणशील तर,
*🌷तरी पुरतेपणालागी । आणिकु दुसरा नाहीं जगीं| ऐसी सामुग्री माझां अंगी । जाणसी तूं॥१६२॥*
     तर या जगात माझ्या इतका गुण व  ऐश्वर्य यांनी संपन्न असा दुसरा माझ्या तोडीचा कोणीही नाही. असे सामर्थ्य माझ्या अंगात असल्याचे तुला माहीत आहेच.
*🌷मृत गुरूपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मीं वर्ते ॥१६३॥*
    अरे ! सांदिपनी गुरूंचा मेलेला मुलगाही मी आणून दिला नाही का? हा माझा पराक्रम तू जाणतोच आहेस पण असा जो मी, निरिच्छ,  नित्य संतुष्ट तो सुद्धा मुकाट्याने कर्ममार्गाचे आचरण करीत आहे.
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌻यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।मम वर्त्मानुवर्तंते मनुष्याः पार्थ सर्वशः॥२३॥*
अर्थ 👉  _जर मी कर्म करण्याविषयी कदाचित निष्काळजी राहीन, तर अर्जुना, खरोखर सर्व लोक माझ्या मार्गाचेच अनुसरण करतील._
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌷परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा। तयाचि एका उद्देशा। लागोनियां॥१६४॥*
    परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणशील तर एका लोककल्याणाच्या उद्धेशानेच एखाद्या सकाम पुरुषाने  केवळ फलाच्या इच्छेने जसे काळजीपूर्वक, दक्षतेने धर्माचरण करावे तसेच मी स्वधर्माचे आचरण दक्षतेने करतो.
*🌷जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ । ते न व्हावें बरळ । म्हणोनियां॥१६५||*
    कारण सर्व प्राणीमात्र आमच्या सारख्यांच्याच तंत्रावरच अवलंबून राहून  चालणारे आहेत. तेव्हा त्यांनी भलतीकडे जाऊन केव्हाही कर्मभ्रष्ट होऊ नये म्हणून.
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌻उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्। संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः॥२४॥*
अर्थ 👉  _जर मी कर्म करणार नाही, तर हे लोक नाश पावतील. संकर करण्याला मी कारण होईन. या प्रजेचा (लोकस्थितीचा) नाश करण्यास कारण होईन._
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌷आम्ही पूर्णकाम होऊनी । जरी आत्मस्थिती राहुनी|तरी हे प्रजा कैसेनि।निस्तरेल॥१६६*
    जर आम्ही निरिच्छ होवून आत्मानंद स्थिती मध्येच निमग्न राहिलो आणि धर्माचरण मुळीच केले नाही. तर प्रजा भवसागरातून कोणत्या तरणोपायाने पार पडेल?
*🌷इहीं आमुची वास पाहावी । मग वर्तती परी जाणावी। ते लौकिक स्थिती अघवी।नासिली होईल॥१६७॥*
     वास्तविक संप्रदाय असा आहे की या लोकांनी आमच्या वर्तनाकडे पहावे व मग धर्माच्या वागणुकीचे प्रकार समजून घ्यावे ही जी लोकांची रहाटी आहे, ती आम्ही  धर्माचे आचरण केले नाही तर बदलून जाईल.
*🌷म्हणोनि समर्थु जो एथें । आथिला सर्वज्ञते । तेणे सविशेषें कर्मातें।त्यजावे ना॥१६८॥*
    म्हणून अर्जुना! जो या लोकांत सार्थ वा सर्व ज्ञानसंपन्न असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग कधीही करू नये.
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌻सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वंति भारत|कुर्याद्विवांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम||२५||*
अर्थ 👉  _हे अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माचे ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात त्याप्रमाणे लोकसंग्रह करण्याची इच्छा करणार्‍या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म (आचरण) करावे._
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌷देखे फळाचिया आशा। आचरे कामुकु जैसा ।कर्मी बहरु होआवा तैसा । निराशाही ॥१६९॥*
     फलाची इच्छा करणारा पुरुष  फलाशेने, जितक्या दक्षतेने कर्माचरण करतो, त्याचप्रमाणे निरिच्छ ज्ञानवानाने ही तितक्याच दक्षतेने कर्माचरणावर विशेष भर दिला पाहिजे.
*🌷जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था|रक्षणीय सर्वथा ।म्हणऊनियां॥१७०॥*
     कारण अर्जुना! लोकसंस्था म्हणजे पुढे होणाऱ्या लोकसमुदायाचे  पुनःपुन्हा सर्व रीतीने संरक्षण करणे आवश्‍यक आहे म्हणून.
*🌷मार्गाधारे वर्तावें।विश्व हें मोहरें लावावें|अलौकिक नोहावें।लोकांप्रति||१७१॥*
     थोरांनी स्वतः सन्मार्गाने वागून लोकांनाही धर्माच्या वैदिक सरळ मार्गाला लावावे, परंतु सामान्य जनास लोकबाह्य वागण्याने आपण कोणी अलौकिक लोकांपेक्षा वेगळे, श्रेष्ठ पुरुष आहोत असे भासून देऊ नये.
⛳⛳⛳🔔🏹🔔⛳⛳⛳
🚩 *ओवी १७२ पासून उद्या*
🚩 *¦¦जयजय रामकृष्णहरि¦¦*

0Shares
error: Content is protected !!